जावे त्यांच्या देशा .....
हे पुस्तक आहे आपल्या लाडक्या पुलंचे . प्रवास वर्णने त्यांनी शब्दांनी रेखाटली आहेत. हे वाचताना आपण त्या-त्या देशांचा, राज्यांचा आणि परिसराचा पूर्ण आस्वाद घेतो. जणू आपण खुद्द तेथे आहोत .
हे पुस्तक वाचल्यावर पुल किती छान लिहितात याच बरोबर किती बारकाईने निरीक्षण करतात याची प्रचीती आली. आपण एखादी जागा पाहिल्यावर बरेचदा किती वर-वर बघतो आणि विसरून जातो. त्या वस्तूचा जणू पूर्ण अनुभव घेत नाही. आपले काही पूर्व ग्रह कदाचित ह्याला कारणीभूत असतिल. स्वछ मानाने आपण काहीच अनुभवत नाही . असे असेल तर कसा आपण आनंद घेणार या कला-कृतींचा ? एखादे मंदिर असो किवा चर्च , संगीत असो कि चित्र त्यातील भाव जो पर्यंत आपल्या मनाला भिडत नसतील तर मग काय उपयोग. सध्याच्या copy-paste जमान्यात आपण नाविन्य हि गोष्टी जणू हरवून बसलोय.
ह्या पुस्तकातले लेख म्हणजे एक - एक स्वप्न आहे. आपण खर्या आयुष्यात जरी हे काहीही अनुभवले नसेल तरी हरकत नाही कारण आपण त्या गोष्टी , स्थळे अनुभवतो … अगदी स्वतः सुद्धा नाही जाणवणार इतक्या आतुरतेने . वर्णन करावे तर पुलंनीच ! एखादा साधा वाटणारा प्रसंग सुद्धा त्यांच्या पाहताना इतका रमणीय आणि जिवंत वाटतो कि आपण काहीसे हावरे होऊन जातो . खरे तर ह्या काही कुतूहल वाटाव्या अशा गोष्टी नहित. पण आपले आयुष्य समृद्ध करण्यासाठी नक्कीच पूर्ण आहेत.
पुलांचे नाट्यवाचन ऎकताना त्यातले भाव जसे मनाला भिडतात तसेच त्यांचे लेख वाचताना त्यातला शब्द-न शब्द आपल्याला जणू जागे करत असते. दर वेळेला वाचाताना नवीन दिशा दिसते. जरी हे लिखाण एका काळातले असाले तरी कोणत्याही वयात वाचावे असेच आहे. लहानांसाठी नविन विचार मोठ्यांसाठी जुन्या आठवणी … खजिना म्हंटले तरी कमीच. वाचनाची आवड नसलेल्यालाही पुस्तक सोडवणार नाहीत.
'जे आहे ते असे आहे ' एवढा सोपा संदेश पण तो हि सगळ्या बारकाव्यांसह. बरेचदा आपल्यालाही काही चित्रे, चित्रपट , संगीत , ठिकाण आवडते आणि ते 'छान ' एवढेच आपण त्याचे वर्णन करू शकतो. हि पुलंना लाभलेली किवा त्यांनी जोपासलेली प्रतिभा आहे कि ते कशाचेही 'छान' पलीकडे कौतुक करू शकतात, भावांना शब्दात मांडू शकतात. चपखल उदाहरणे देऊन वाचकाला खिळवुन ठेवतात.
पुलांचे लिखाण , त्यांचे नाट्यवाचन यावर मज पामराने कितीही लिहिले तरी कमीच … हे पुस्तक वाचताना राहवलं नाही आणि सगळ्यांना सांगावासा वाटलं कि हे पुस्तक जरूर वाचा . मराठी भाषा सुंदर आहेच आणि पुलंनी ती आणखी समृद्ध करून ठेवलीये ते अनुभवा !
No comments:
Post a Comment